निवडणूक प्रशिक्षणाला कर्मचार्‍यांची दांडी

गोंदिया: निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु या प्रशिक्षणाला बहुतांश कर्मचारी अनुपस्थित असल्याचा प्रकार मंगळवारी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिरादरम्यान पहावयास मिळाला असून संबंधित कर्मचार्‍यांवर नियमानुसार प्रशासन कारवाई करणार काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यामध्ये येत्या 18 डिसेंबर रोजी 348 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असते. यासाठी प्रशासकीय यंत्रणेत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांची मतदान केंद्रावर नियुक्ती केली जाते. यासाठी त्यांना प्रशिक्षणासह कर्तव्य बजावण्यासाठी अतिरिक्त मानधनही दिला जातो. मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 ते संध्याकाळी 4.30 या कालावधीत येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षण शिबिराला अनेक कर्मचारी अनुपस्थित होते. विशेष म्हणजे यात महिला कर्मचार्‍यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. आयोजित प्रशिक्षण शिबिरात अनुपस्थित असणार्‍या कर्मचार्‍यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 26 व 134 अन्वये कारवाई करण्यात येते. तसे संबंधित कर्मचार्‍यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नोंदही केली असते. असे असताना अनेकदा बहुतांश कर्मचारी अनुपस्थित असतात. मात्र आजपर्यंत एकाही अनुपस्थित कर्मचार्‍यावर कारवाई झाल्याचे ऐकवित नाही किंवा पहावयास आले नाही. आता ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया संदर्भात आयोजित प्रशिक्षण शिबिरात अनुपस्थित असणार्‍या कर्मचार्‍यांवर जिल्हा तथा तालुका निवडणूक अधिकारी नियमानसार कारवाई करतील काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Share