मानव विकास कार्यक्रमात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा : आयुक्त

गोंदिया : मानव विकास निर्देशांक वाढीसाठी आधारभूत असलेल्या आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती व उत्पन्न वाढ या घटकांवर लक्ष केंद्रित करूनच मानव विकास कार्यक्रम राबविण्यात यावेत. हे करत असतांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना आयुक्त मानव विकास नितीन पाटील यांनी यंत्रणेला केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मानव विकास कार्यक्रम आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास बालमुकुंद पाचखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, शिक्षणाधिकारी कादर शेख, माविमचे संजय संगेकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकल व बस सुविधा या योजना आहेत. या योजनेत या वर्षात 8330 लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 2180 लाभार्थ्यांसाठी पुरवणी निधीची मागणी करण्यात आल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी संगितले. त्याचप्रमाणे मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गाव ते शाळा दरम्यान बस वाहतुकीची सुविधा योजनेत प्रत्येक तालुक्याला सात बस पुरविण्यात आल्या आहेत. या बस मधून प्रवास करण्यासाठी विद्यार्थिनींना पासेस तत्काळ वितरित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

नगरपालिका क्षेत्रात व मोठ्या गावात जिल्ह्यात 173 अभ्यासिका स्थापन करण्यात आल्या आहेत. अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सोईनुसार उघड्या ठेवाव्यात असे त्यांनी सांगितले. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आठ बालभवन केंद्राची दुरुस्ती करून 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना बालभवन भेट घडवून आणावी असे त्यांनी सांगितले. गरोदर व स्तनदा माता व बालकांची आरोग्य तपासणी योजनेत 2180 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील पात्र बाळांत महिलांना बुडीत मजुरी देण्यात आली आहे. महिलांची आरोग्य तपासणी व बुडीत मजुरी योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना पाटील यांनी केल्या.

गोंदिया जिल्ह्यात धान, मत्स्यव्यवसाय, शिंगाडे मोठ्या प्रमाणात होतात. यावर व्यवसाय उभारणीला चालना देण्यात यावी. यासाठी मानव विकास कार्यक्रमात निधीची तरतूद करण्यात येईल असे पाटील म्हणाले. रोजगार निर्मितीच्या तालुका विशेष योजना व कौशल्य विकास व रोजगार निर्मिती योजना, विशेष बाब अंतर्गत रोजगार निर्मिती विषयक योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण व त्यांना रोजगार निर्मिती साधन पुरविणे याबाबतचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील अति दुर्गम आदिवासी क्षेत्रात ज्यांना मराठी भाषा समजत नाही त्यांच्यासाठी त्यांच्याच भाषेत शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमात निधी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. गोंडी भाषेत शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा असे पाटील म्हणाले.

Print Friendly, PDF & Email
Share