‘महिन्याचा मानकरी’ पुरस्काराने कर्मचार्‍यांचा सत्कार

गोंदिया: प्रशासनात अनेक अधिकारी-कर्मचारी वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण काम करीत असतात. त्यासाठी त्यांना कौतुकाची थाप सुद्धा मिळते आणि पुरस्कारही मिळतात. मात्र कार्यालयीन रचनेत शेवटी असणार्‍यांना व्यक्तींचे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन कौतुक केल्याचा क्षण दुर्मिळ असतो. जिल्हा पुरवठा कार्यालयाने कामाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी महिन्याचा मानकरी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. सकारात्मक व लोकाभिमुख काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन ‘महिन्याचा मानकरी’ पुरस्कार देऊन पुरस्कृत तर केलेच सोबत नवी प्रेरणा सुद्धा दिली.

प्रशासनात आपली कामगिरी सुधरावयाची असेल तर आपण संघ म्हणून यशस्वी होणे गरजेचे आहे. संघ तेव्हा यशस्वी होतो जेव्हा त्यास आपल्या टीमबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते. जिल्हा पुरवठा कार्यालय गोंदियाने हा प्रयत्न केला आहे. याला साथ लाभली ती अर्थातच जिल्हाधिकारी यांची. या नियोजन ते अंमलबजावणी टप्प्यासाठी उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ‘महिन्याचे मानकरी’ हा पुरस्कार विभागाने सुरू केला आहे. या महिन्याच्या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकार्‍यांनी गोरेगाव येथील शासकीय धान्य गोदामात जाऊन केले. गोदाम परिसर, लावलेली वृक्ष, रेकॉर्ड कीपिंग, धान्य स्टॅकिंग या बाबत त्यांनी आढावा घेतला. स्वयंस्फूर्तीने शासकीय धान्य गोदामातील हमाल मंडळींनी गोदाम व्यवस्थापक मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांची जोपासना केली आहे. गोदाम परिसरास आपल्या दैनंदिन कामकाजासह एक प्लेझंट वर्कप्लेसचे स्वरूप दिले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी यासाठी सर्व हमाल मंडळीचे प्रशस्तीपत्र देऊन कौतूक केले.

या महिन्यात गोदाम व्यवस्थापक भूषण राऊत अर्जुनी यांनी 78 टक्के दुकानात धान्य पोहोचवून, तर पुरवठा निरीक्षक संवर्गात स्मिता आगाशे यांनी सर्वात प्रथम चलन, परमिटचे काम पूर्ण करून व अव्वल कारकून संवर्गात किशोर ठवरे यांनी सप्लाय चैन व्यवस्थापनास गती दिल्याने त्यांना महिन्याचे मानकरी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी सन्मानित केले. जिल्हाधिकारी स्वतः येऊन कौतूक करतात, ही बाब अधिकारी कर्मचार्‍यांचा उत्साह वाढवणारी आहे. नियोजन ते अंमलबजावणी यासाठी प्रत्येक महिन्याला पुरवठा विभाग महिन्याचा मानकरी हा पुरस्कार आपल्या अधिकारी कर्मचार्‍यांना देणार आहे. यामुळे त्यांच्या कामाचा हुरूप वाढेल व अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी लीना फाळके यांनी सांगितले.

Share