भेसळयुक्त मिठाईपासून सावधान, ‘बेस्ट बेफोर’ची माहितीविना बाजारपेठ सजली
देवरी १२: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मागणी वाढते. तसेच या काळात पनीर आणि खव्यामध्ये देखील भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. पनीर आणि खवा खाल्यावर पोटाचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, अन्यथा खवा व पनीर यामधील भेसळीमुळे पोटाचे विकार वाढण्याचा धोका आहे.
दिवाळी सणात एकमेकांना भेट म्हणून गोड पदार्थ तसेच भेटवस्तू दिल्या जातात. याच कालावधीत मिठाई, कंदील, रांगोळ्यांनी बाजारपेठा फुलून जातात. खरेदीची लगबग सुरू होते. सध्या खरेदीची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई किंवा गोड पदार्थ घरोघरी विकत आणले जात आहेत. परंतु याचवेळी ग्राहकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
घरच्या घरी ओळखा भेसळ
पदार्थांमधील भेसळ घरच्या घरी ओळखता येते. अस्सल पनीर लोण्यासारखे मुलायम असते. भेसळयुक्त पनीर खूप घट्ट, चिवट असू शकते. भेसळयुक्त पनीर तोडण्यासाठी खेचावे लागते. बाहेरून आणलेले पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट होते.
वाढू शकतो पोटाचा त्रास
भेसळयुक्त पनीर, खवा यासारखे पदार्थ खाल्यास विषबाधा होते. पित्त वाढणे, गॅसेस याबरोबरच पोटात मळमळणे, जुलाब आदी त्रास उद्भवतात. अनेकदा हगवणीच्या त्रासाचाही सामना व्यक्तीला करावा लागू शकतो.
सणांमध्ये वाढलेली मागणी आणि मिळणारा नफा या दोन्हींचा विचार करून व्यापारी अशा प्रकारे भेसळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बाजारातून वस्तू घेताना ग्राहकांनी मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे, अन्यथा ते जीवावरही बेतू शकते. दिवाळी सणात खाद्यपदार्थाच्या वरच्या गुणाला न भुलता ते पदार्थ किती प्रमाणात अस्सल आहेत, याबाबत खात्री करूनच खरेदी करावी, अन्यथा आराेग्यविषयक समस्यांमुळे जिवावर बेतू शकते.
दुधाच्या उत्पादनांमध्ये भेसळ
दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांममध्ये पनीर, खवा, रबडी, गोड दही इत्यादी साफ आणि शुद्ध दिसण्यासाठी अनेक पदार्थ मिसळले जातात. या भेसळीमुळे विविध शारीरिक आजारांना सामोरे जावे लागू शकते. अधिक नफा कमविण्यासाठी मिठाई, दूध किंवा पनीरमध्ये भेसळ करतात. बऱ्याचवेळा दुधामध्ये युरिया मिसळल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत.
तक्रार इथे करता येते:
ग्राहकांनी काय करावे मिठाई तयार केलेल्या दिवसाची आणि कालबाह्यतेची तारीख लावलेली नसेल तर संबंधित ग्राहक दूकानदाराविरोधात पुराव्यानिशी अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात. ग्राहकांनी अशा मिठाईचे फोटो काढून ते संकेतस्थळावर ” कंज्युमर कन्सन’ या पर्यायवर तक्रार करू शकता.