जिल्हा परिषदेच्या 97 शाळेमध्ये फक्त एकच ‘गुरुजी’
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांतील गळती ही नविन बाब नाही. जिल्हा परिषद शाळांमधुन गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा हेतु प्रामाणिक असला तरी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करणेही तितकेच आवश्यक बाब आहे. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या 1 ते 4 वर्ग असलेल्या तब्बल 97 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने या शिळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना कसे गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळेल? असा प्रश्न जनमानसात उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो. येथे उपशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आदी अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी जिल्ह्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असले तरी शिक्षकांसह अन्य जागा भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या शाळांमध्ये किमान 2 शिक्षक नियुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. असे असले तरी तब्बल 97 शाळा एक शिक्षकी आहेत. 4 वर्गांतील विद्यार्थ्यांना एकच शिक्षक ज्ञानदान करत आहेत.
प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम वेगळा असताना एकाच ठिकाणी बसवून एकच शिक्षक त्या विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एकेकाळी जिल्हा परिषदेच्या शाळांनी गौरव प्राप्त केला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या शाळांना गळती लागली आहे. शासनाचे धोरण याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. शासन जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी विविध अभियान राबवत असले तरी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे गरिब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय होण्याची भिती वर्तविली जात आहे.
जिप शिक्षण विभागात विविध संवर्गातील 517 पदे रिक्त
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1039 शाळा आहेत. या शाळांमध्ये 86 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षकांची पदे दरमहिन्याला रिक्त होत असल्यामुळे कार्यरत शिक्षकांवर त्याचा ताण येत आहे. मागील आठ वर्षांपासून शासनाने शिक्षक भरती केली नाही. गोंदिया शिक्षण विभागात विविध संवर्गातील 3874 मंजुर पदांपैकी 3357 पदे कार्यरत असून 517 पदे रिक्त आहेत. एकीकडे शाळांमध्ये शिक्षक नाहीत, तर दुसरीकडे डीएड पात्रताधारकांची मोठी फौज तयार झाली आहे.
शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती करू – शिक्षणाधिकारी
शासनाची शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावातीलच सुशिक्षित तरूणांना शिक्षक स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी सांगितले.
तालुकानिहाय एक शिक्षकी शाळांची संख्या
अर्जुनी मोर व गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी 7 शाळा, देवरी व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी 16, आमगाव 4, गोरेगाव 13 आणि तिरोडा तालुक्यात सर्वाधिक 20 शाळा एक शिक्षकी अशा जिल्ह्यात वर्ग 1 ते 4 थीपर्यंतच्या 97 शाळांमध्ये एक शिक्षक कार्यरत असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मुंबई मंत्रालयातील सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांना 22 सप्टेंबर रोजी पाठविलेल्या अहवालात नमुद केली आहे.