तिरोडा पंसच्या दोन अधिकार्‍यांवर एसीबीची कारवाई

तिरोडा: वैद्यकीय रजेची फाईल मंजूर करवून देणे व वेतन काढून देण्यासाठी 17 हजार रुपये लाच मागणार्‍या तिरोडा पंचायत समितीच्या दोन अधिकार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 7 सप्टेंबर रोजी कारवाई केली. यातील एका आरोपीला एसीबीने ताब्यात घेतले असून दुसरा फरार आहे. पंसचे सहायक प्रशासन अधिकारी प्रदीप बंसोड रा. तिरोडा असे फरार तर वरिष्ठ सहायक प्रमोद मेश्राम रा. गोंदिया अशी ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार हे विस्तार अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रजेची फाईल व वेतन काढून देण्याकरिता सहायक प्रशासन अधिकारी प्रदीप बंसोड याच्याकडे मागणी केली होती. यावेळी बंसोड यांनी वैद्यकीय रजेची फाईल मंजूर करवून देणे व वेतन काढून देण्याकरिता दूसरा आरोपी वरिष्ठ सहायक प्रमोद सदाशिव मेश्राम याच्यानावे 10 हजार रुपये व स्वतःकरिता 7 हजार रुपये अशा एकूण 17 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. याप्रकरणीत तक्रारकत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली. दरम्यान एसीबी पथकाने पडताळणीअंती 7 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष कारवाई करीत असताना दोन्ही आरोपींना संशय आल्याने लाच स्विकारण्यास नकार दिला. दरम्यान एसीबीने प्रदीप मेश्राम याला ताब्यात घेतले असून प्रमोद बंसोड याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध तिरोडा पोलिस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबी नागपूरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधूकर गीते, एसीबी गोंदियाचे पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहीरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजय बोहरे, मिल्कीराम पटले, नापोशि राजेंद्र बिसेन, मागेश कहालकर, अशोक कापसे, चालक नापोशि दीपक बाटबर्वे यांनी केली.

Share