गोंदिया 03: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग शोध मोहीम व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम येत्या 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्यावी माहिती. जिल्हा समन्वय समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत सभाध्यक्षा जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिली. प्रसंगी जिल्हा क्षयरोग व कुष्ठरोग मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे उपस्थित होते. मोहिमेत मोठ्या प्रमाणात जनजगृती होणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी शहरी व ग्रामीण भागासाठी विविध चमू कार्यान्वित केल्या जाणार आहे. पर्यवेक्षणासाठी गाव निहाय आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आशा गटप्रवर्तक, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची निवड केली जाणार असुन सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पथक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करणार असून रोगाची लक्षणे आहेत किंवा नाही या बाबत तपासणी करून आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकिय अधिकारी व उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी तपासणी करुन औषधोपचार सुरू केला जाणार आहे. घरी येणार्या पथकाला तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत यांनी केले आहे. सभेला जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक उपस्थित होते.









