मोती जडित, फेटे वाले गणेशमूर्तीला भक्तांची पसंती,

देवरी 30: अवघ्या 1 दिवसांवर गणेशोत्सव आहे. त्यानिमित्ताने गणेश मूर्तीना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या गणेशोत्सवात रंगीबेरंगी कापडी फेटे, धोतर परिधान केलेल्या मोतीजडित मूर्तीना गणेशभक्तांनी पसंती दिली आहे. त्यामुळे मागणीनुसार आकर्षक मूर्ती उपलब्ध करुन देण्यावर मूर्तीकारांचा भर राहिलेला पहायला मिळत आहे.

मागील दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा झाला होता. मात्र यंदा सर्व निर्बंध शिथील झाल्याने यंदाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. फेटा हा महाराष्ट्रात रुबाबदारपणाचे प्रतीक म्हणून असल्यामुळे त्याचा वापर मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी केला जात आहे. पैठणी, जरीचे कापड अशा विविध रंगांचे कापड घेऊन हे फेटे तयार करून मूर्तीची सजावट केली जात आहे. याशिवाय कापडी धोतर नेसविले जात आहे. त्यावर आकर्षक असलेल्या कलाकुसरीमुळे फेटे व धोतर अधिकच मूर्तीची शोभा वाढवीत असल्याने अनेक जण अशाच मूर्तीना पसंती देत असल्याचे मूर्तिकारांनांचे म्हणने आहे. मूर्ती अधिक आकर्षक दिसावी यासाठी मुकुट व गणेशाच्या अंगावरील आभूषणे ही मोतीजडित करवून घेतली जात आहे.

एका साधारण उंचीच्या मूर्तीला तयार करण्यासाठी साधारणपणे अर्धा ते एक दिवसाचा कालावधी जातो. मूर्ती मोठी असेल व त्यातील काम जास्त असेल तर दोन दिवस लागत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती तयार करण्याच्या शाळा आहेत. यावर्षी शासनाने घरगुती व सार्वजनिक अशा गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळेच विविध चित्रशाळेत शाडू मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्याच्या व त्यांना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्राहक ही गणेशमुर्तीची नोंदणी करण्यासाठी कलाकेंद्रात येऊ लागले आहेत. शहरातील अनेक ठिकाणच्या चित्रशाळेत 60 टक्क्यांहून अधिक नोंदणी झाली आहे. तसेच यावर्षी मूर्तीच्या किमतीत ही पाचशे ते 10 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Share