‘हर घर तिरंगा’ मोहीमेत सहभाग घेऊया, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करूया : मुख्याधिकारी अजय पाटणकर

देवरी 08: भारताच्या स्वतंत्रतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे. त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने यावर्षी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देशात साजरा करण्यात येत आहे.

त्यानिमित्त केंद्र शासनामार्फत ऑगस्ट महिन्यात संपूर्ण भारत देशात एक विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ती म्हणजे, ‘हर घर तिरंगा’ मोहीम. त्याच अनुषंगाने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात ‘घरोघरी तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन देशाविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीमेत सहभाग घेऊया, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करूया असे मत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे व्यक्त केले.

राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि आदर यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्धेशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अजय पाटणकर मुख्याधिकारी देवरी , शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे , नगरपंचायतीचे अधिकारी श्री. आचले यांच्या सह शाळेतील शिक्षक आणि विध्यार्थी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share