रब्बी हंगामातील उर्वरित ७० टक्के धानाची खरेदी करा : आ. डॉ. देवराव होळी

वृत्तसंस्था / मुंबई : रब्बी हंगामातील धानाची खरेदी करताना केवळ ३० टक्के धानाची खरेदी करून खरेदी केंद्र मुदतीपूर्वीच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून रब्बी हंगामातील उर्वरित ७० टक्के धानाची खरेदी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला तातडीने निर्देश देण्यात यावेत व खरीप हंगामातील धानाला बोनस देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.
यावेळी विदर्भातील आमदारांनी आपल्या मागणीचे संयुक्त हस्ताक्षरातील निवेदन उपमुख्यमंत्री महोदयांना दिले. याप्रसंगी विदर्भातील आमदार डॉ परिणयजी फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार टेकचंद सावरकर आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे चर्चा चिंता करू नये शेतकऱ्यांचे धान लवकरच खरेदी करण्यात येतील असे आश्वासन आमदार महोदयांच्या निवेदनाच्या वेळी दिले.
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर हे धानाचे प्रमुख उत्पादक जिल्हे असून या जिल्ह्यांमध्ये यावर्षीच्या रब्बी हंगामातील धानाची खरेदी थांबलेली आहे. यावर्षी खरीप हंगामातील धानाला महाविकास आघाडी सरकारने बोनस नाकारले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रब्बी हंगामातील धानाची ३० टक्के च खरेदी करून खरेदी केंद्रही बंद करण्यात आले. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकातील उर्वरित 70 टक्के धानाची खरेदी करण्यासंदर्भात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व खरीप हंगाम २०२१-२२ मधील धानाला बोनस देण्यात यावा अशी मागणी विदर्भातील आमदारांसह या निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ देवराव होळी यांनी केली आहे.

Share