घोटाळा: देवरीच्या तीन मग्रारोहयो कर्मचाऱ्यांवर कारवाई, तत्काळ प्रभावाने सेवेतून कमी करण्याचे आदेश
◼️गोठा बांधकामात अफरातफर : तत्काळ प्रभावाने केले कामावरून कमी
गोंदिया: देवरी पंचायत समिती अंतर्गत डवकी ग्राम पंचायतींतर्गत गोठ्यांचे बांधकाम झाले होते. त्या कामात सरपंच आणि सचिवाने अफरातफर केल्याचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात होते. प्रकरणाची सखोल चौकशी विभागामार्फत करण्यात आली. दरम्यान देवरी पंचायत समितीच्या मग्रारोहयो विभागात कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौतम साखरे, तांत्रिक अधिकारी मनोज बोपचे आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर मुनेश्वर भूमेश टेंभरे दोषी आढळले. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रभावाने कामावरून कमी करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील डवकी येथे गायींच्या गोठ्याच्या निधीत सरपंच आणि सचिवाने अफरातफर केल्याची तक्रार झाली होती. त्या अर्जाची चौकशी केली. या प्रकरणात गट विकास अधिकारी यांनी दस्तऐवजांची तपासणी केली. त्यात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौतम साखरे यांनी गुरांच्या गोठ्यांचे प्रस्ताव न तपासता कामाचे हजेरीपत्रक काढणे, लाभार्थिंना रक्कम अदा करण्यापूर्वी तपासणी केली नसल्याचे उघड झाले. सध्याचे गोरेगाव पंचायत समितीचे सभापती तथा तत्कालीन देवरी पंचायत समितीच्या मग्रारोहयो विभागातील तांत्रिक अधिकारी (कृषी) मनोज बोपचे यांनी कामाला भेट न देता प्रत्यक्ष मोजमाप न करता मोजमाप पुस्तकात नोंद करणे, सुरुवातीच्या कामाची नंतर व नंतरच्या कामाची आधी नोंदी घेतल्याचे उघड झाले. तसेच क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर मुनेश्वर भूमेश टेंभरे यांनी साहित्याच्या देयकात मूळ क्रमांक व दिनांक स्वमर्जीने बदल करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला. तिन्ही कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्यामुळे त्यांची सेवा कंत्राटी पद्धतीची असतानाही शासकीय निधीचा अपहार करण्यात सहकार्य केल्याने तिघांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून कमी करण्याचा आदेश आज, 30 जून रोजी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी काढला.