विनापरवाना बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यावर कारवाई
गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने 21 जून रोजी धाड टाकून विनापरवाना बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईत 5 लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खरीप हंगामाची कामे सुरु झाली असून शेतकरी बियाणे, कीटकनाशके व खते खरेदीकरिता कृषी केंद्रावर गर्दी करीत आहे. कृषी विभागातर्फे देखील यंदा खतांचा साठा मुबलक असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कृषी विभागातर्फे अधिक दराने विक्री किंवा काळाबाजारी होऊ नये यासाठी भरारी पथकाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. या पथकाला गोरेगाव तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथे विनापरवाना बियाणे व कीटकनाशके विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान पथकाने विना परवाने बियाणे व कीटकनाशके विक्री करणारे उमेश श्रावण गौतम याच्या दुकानावर धाड टाकून 5 लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात बियाणे नियंत्रण आदेश 1983, किटकनाशक कायदा 1968, कीटकनाशक नियम 1971, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी एम. के. मडामे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे तंत्र अधिकारी संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बावनकर, तालुका कृषी अधिकारी एस. जे. पाटोळे, पंसचे कृषी अधिकारी राजेश रामटेके यांनी केली.