जिल्हात घरकुलाच्या रेतीसाठी 9 घाट राखीव

गोंदिया 26: जिल्ह्यात घरकुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, रेतीचे दर जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांना रेती विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील 31 पैकी 9 रेतीघाट राखीव ठेवले आहेत. या घाटांवरील रेतीचा व्यावसायीक उपयोग करण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, 19 नोव्हेंबर 2018 नुसार तहसीलदारांची लेखी पूर्व परवानगी घेऊन ज्या वाळू गटांना पर्यावरण मान्यता आहे, त्या वाळुघाटातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता असलेल्या शासनाच्या गृहनिर्माण योजनांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरगुती किंवा शेतीच्या प्रयोजनांसाठी राखीव ठेवण्यात तरतूद आहे. त्यानुसार 28 जानेवारीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात 2021-22 करीता 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या मुदतीसाठी पर्यावरण मान्यता मिळालेल्या 31 रेती घाटांपैकी 9 रेतीघाट राखीव ठेवण्यात आले आहेत.

गोंदिया तालुक्यातील जिरुटोला येथील वाघनदीच्या पात्रात 1187 ब्रास, डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या घाटातून 15710 ब्रास, सतोना येथील वाघनदीच्या पात्रात 1113 ब्रास, तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीच्या घाटात 1979 ब्रास, आमगाव तालुक्यातील घाटटेमनी येथील वाघनदीच्या घाटात 1527 ब्रास, सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेंडी येथील चुलबंद नदीच्या घाटात 1073, घाटबोरी तेली येथील चुलबंद नदीच्या पात्रात 1113 ब्रास, अर्जुनी मोर तालुक्यातील सिंघमर्‍हान येथील गाढवी नदीच्या पात्रात 1131 ब्रास व वडेगाव बंध्या येथील गाढवी नदीच्या पात्रातील 1476 ब्रास रेती राखीव ठेवण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share