वनहक्क प्राप्त समित्यांना तेंदूपाने संकलनाचा अधिकार द्या
देवरी: सन 2022 च्या तेंदूपत्ता हंगामात व येणार्या पुढील काळात शासन नियुक्त घटकधारक व सामुहीक मान्य वनहक्क ग्रामसभामध्ये संघर्ष व विवादाची स्थिती उद्भवयास नको म्हणून सामुहिक हक्क अधिनियम 2006 नुसार सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा व वन हक्क समित्यांना त्यांचे हक्क प्राप्त क्षेत्रातून यादीत नमुद केलेल्या निर्धारित अपेक्षित लक्षाऐवढे तेंदूपाने संकलित करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी वनहक्क समित्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चिचगड अप्पर वनपरिक्षेत्रातील 2022 तेंदूपत्ता संकलन हंगामाकरीता ई-निविदा जारी करण्यात आली. त्यात तेंदू घटक नमूद करून तेंदू संकलनाचे उद्दिष्ट दिले गेले. मात्र वनहक्क समितीचे कोणते गाव कोणत्या तेंदू घटकात समाविष्ट आहेत. या घटकात असलेली नेमकी गावे कोणती, गावनिहाय वनक्षेत्र किती, गावनिहाय काय उद्दिष्ट आहेत. या बाबतची माहिती वनहक्क समितीला देण्यात यावी, याकरीता गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड अप्पर वनपरिक्षेत्रातील धमदीटोला येथे वनविभाग व वनहक्क समितीची सार्वजनिक सभा घेण्यात आली होती. या सभेत वनहक्क समित्यांचे त्यांचे अधिकारी त्वरित देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.