मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिकेत हिंदी शब्दांचा वापर

गोंदिया: नवोदय विद्यालयासाठी सन 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी आज, 30 एप्रिल रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र मराठी माध्यमाच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल पाच प्रश्नांमध्ये हिंदी भाषेचा उल्लेख समोर आला. हा प्रकार मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांवर अन्याय असून त्या प्रश्नांचे गुण देण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

गरजू, गरीब असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्याच जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात नवेगावबांध येथे नवोदय विद्यालय असून आज, 30 एप्रिल रोजी या विद्यालयात इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षेतंर्गत गणित विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र या पेपरमध्ये मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 46, 47, 51, 59, 50(एफ) मध्ये हिंदी शब्दांचा जसे मराठीतील ‘लघुत्तम सामाईक विभाजका’ऐवजी हिंदीत ‘लघुत्तम समापवर्तक’ शब्द वापरल्याने मराठी माध्यमांतील विद्यार्थी गोंधळल्याचे चित्र होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे ज्या प्रश्नात हिंदी शब्द आलेत, त्या प्रश्नांचे सरासरी साडेसात गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे. महाराष्ट्र शैक्षणिक परिक्षा मंडळाने या विद्यार्थ्यावर अन्याय न करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे चुकीच्या प्रश्नांचे गुण द्यावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा पालकांनी दिला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share