देवरी नगरपंचायतीने दिली कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कामे ? काय म्हणाले मुख्याधिकारी वाचा
◼️गोंदिया जिल्हातील 5 नगरपंचायतीचा समावेश ◼️नियमांचे केले उल्लंघन: चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
देवरी 24: गोंदिया जिल्ह्यातील देवरी , सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, सालेकसा आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नियमांना डावलून कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कुशल आणि अकुशल कामांचे कंत्राट दिल्याचा आरोप रोशन बडोले यांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकाराची तक्रार नागपूर विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण : नगरपंचायतीअंतर्गत विकास कामे करताना कुशल व अकुशल ही कामे कार्यक्षेत्रातील संस्था व कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात यावीत असा नियम आहे. असे असताना देखील देवरी , सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, सालेकसा नगरपंचायतीने कार्यक्षेत्राबाहेरील असलेल्या राजीव सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, खुरखुटी, ता. तिरोडा यांना काम दिले. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम १९६५ च्या कलम ४९ नुसार नगरपंचायती आवश्यक कर्तव्य व कार्य नमूद केले आहे. कलम ४९ अ अन्वये असे कर्तव्य व कार्य नगरपंचायत स्वतः किंवा अभिकर्त्यामार्फत करू शकते. अभिकर्त्याकडून असे कार्य पार पाडण्यासाठी नगरपंचायतीला शासनाद्वारे विविध अटी व शर्ती विसंग नसेल, अशा अटी विहित करू शकतात. तसेच यासाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक असणे अनिवार्य आहे. निविदा प्रक्रियेत त्रुटी राहू नयेत यासाठी नगरपंचायत स्तरावर निविदा समिती गठित करणे आवश्यक आहे.निविदा समिती गठीत आहे मात्र सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, सालेकसा आणि देवरी नगरपंचायतीने काही नियम व अटींचे पालन केले नाही अशी माहिती उघड झाली आहे .
या पाचही नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून कुशल व अकुशल कामे कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला दिल्याचा आरोप बडोले यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून नियमबाह्य कामे करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रोशन बडोले यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीतून केली.
सदर प्रकाराबद्दल प्रहार टाईम्सनीं देवरीचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
निविदा प्रक्रिया राबवत असताना संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मागितले जाते. राजीव बहुद्देशीय संस्था ही सहकार कायद्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. कार्यक्षेत्राची माहिती विचारली जात नाही. तिरोडा सहायक निबंधक कार्यलयाकडे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राबाबद्दल पत्रव्यवहारा मार्फत विचारणा केली आहे. याबाबत पत्रव्यवहार चालू आहे. त्यास अनुषंगिक पुढील कार्यवाही केली जाईल.
अजय पाटणकर , मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी