रेशन दुकानांना मिळणार CSC सेंटरची जोड

गोंदिया: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या सबलीकरणासाठी आता अनेक अत्याधुनिक सेवा रेशन दुकानांतून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी सीएसी सेंटरची जोड रेशन दुकानांना देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या समझोता करारनाम्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे आता रेशन दुकानांत इंकम टॅक्सही भरता येणार आहे.

‘डिजिटल इंडिया’ ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. याचा उद्देश शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करून देणे आहे. या माध्यमातून आता बँकांचे व्यवहार, रेल्वे, विमान तिकीटे, विविध प्रकारची बिले, मोबाईल रिचार्ज, शेतीविषयक सेवा, इंकम टॅक्स अशा विविध ऑनलाईन सेवा आता थेट रेशन दुकानांतून मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवार, 19 एप्रिल रोजी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लि. या कंपनीसोबत करारनाम्यावर स्वाक्षरी झालेली आहे.

राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे आर्थिक स्रोत वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. शासनाच्या वतीने पुरवठा विभागाचे सहसचिव कोळेकर यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, सहसचिव कोळेकर, पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुळकर्णी, वैभव देशपांडे, सीएससी सेटंरचे व्हाईस प्रेसिडेंट समीर पाटील उपस्थित होते. आता सर्वच क्षेत्रांत ऑनलाईन सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची गैरसोय टळावी तसेच त्यांना तत्परतेने सेवा उपबल्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ऑनलाईन सेवा सुरू करण्यासंदर्भात इच्छूक असलेल्या रेशन दुकानदारांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सीएससी सेंटरच्या माध्यमातून राज्यातील रास्तभाव दुकानदार आता दुकानांमधून बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे, विमान तिकीटे बुकिंग, सर्व प्रकारचे बिल्स जसे लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, आरोग्य सेवासुविधा, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सर्व सेवा, इंकम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज इत्यादी सेवा मिळणार आहेत.

Share