लाचखोरी प्रकरणातून पोलिस उपनिरीक्षकाची निर्दोष सुटका

भंडारा: रेती तस्करांकडून लाचखोरी केल्याच्या प्रकरणात तुमसर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नीलम डोंगरे यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपासाअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजू शेंडे यांनी डोंगरे यांना निर्दोष मुक्त केले आहे.

पोलिस स्टेशन तुमसर येथे नीलम डोंगरे हे सन 2015 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी कर्तव्यादरम्यान रेती चोरी प्रकरणात नितेश राजगिरे या ट्रक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात अटक न करण्यासाठी व मालकीची जेसीबी मशीन जप्त न करण्याकरिता 50 हजारांची लाच मागितली असल्याचा आरोप नितेश राजगिरे यांनी केला. याबाबत त्यांनी भंडारा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांनी लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याने या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून करण्यात आला होता.

सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले. यावेळी आरोपीच्या आवाजाचे नमुने तसेच पाच साक्षीदार तपासण्यात आले. तपासादरम्यान पोलिस महासंचालकांनी न्यायालयात अभियोग दाखल करण्यासाठी लागणारी मंजुरी नाकारली. त्याचप्रमाणे तक्रारदार व आरोपी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणात दरम्यान कुठेही आरोपीने स्वतःहून लाच मागितल्याचा उल्लेख झाला नाही. सबळ पुराव्यांच्या आधारे सक्षम अधिकायाने मंजुरी नाकारल्यावर पुन्हा त्याच पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने मंजूरी प्रदान करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नीलम डोंगरे यांना लाचखोरी प्रकरणातून दोषमुक्त केले.

Share