पालकमंत्र्यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा
गोंदिया,दि.12 : शेतीचे वीज कनेक्शन असणाऱ्या व वारंवार बंद पडणाऱ्या रोहित्राची यादी तयार करून अशा रोहित्राच्या क्षमता वृद्धीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी जोडण्या, वीज पुरवठा, रोहित्रावरील अतिरिक्त भार, भविष्यातील भारनियमन, रोहित्राची देखभाल दुरुस्ती आदी विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विजेची अचानक कमतरता निर्माण झाली असून येणाऱ्या काळात भारनियमन करावे लागणार आहे. याचा ग्राहक व नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. ही परिस्थिती संयमाने हाताळण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. भारनियमनाच्या वेळापत्रकाची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज देयकांबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे वीज देयक दुरुस्ती करून देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
00000