भंडारा : गाय धुताना रस्‍त्‍यावर पाणी गेल्‍याने वाद, वृद्धाचा खून

भंडारा : किरकाेळ कारणावरुन झालेल्या वादात वृद्धाचा खून झाल्‍याची घटना भंडारा तालुक्यातील मानेगाव/बाजार येथे मंगळवारी घडली. महादेव श्रीपत बोंदरे (वय ५६ रा. मानेगाव बाजार) असे खून झालेल्‍याचे नाव असून या हल्‍ल्‍यात दिनेश महादेव बोंदरे असे गंभीर जखमी झाला आहे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर विठोबा मते (वय ५०), विक्की चंद्रशेखर मते (वय २४), मयूर चंद्रशेखर मते (वय १९), सरिता चंद्रशेखर मते (वय ४७, सर्व रा. मानेगाव बाजार ) या संशयित आरोपींची अटक करण्यात आली आहे.

मुलाला वाचवायला गेलेल्‍या वडिलांना काठीने मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी, मानेगाव बाजार येथील मते आणि बोंदरे कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. दोन्ही कुटुंबात काही वर्षांपासून वाद आहे. मंगळवारी संध्याकाळी महादेव बोंदरे हे आपल्या घरासमोरील रस्त्यावर गाय धूत होते. ते पाणी मते यांच्या घरातील आवारात आले. चंद्रशेखर मते याने महादेव बोंदरे यांच्याशी भांडण केले. भांडण सुरू असताना महादेव यांचा मुलगा दिनेश याने भांडण कशाला करता असे म्हटले. आराेपींनी दाेघांना जीवे मारण्याची धमकी देत बापलेकाला मारहाण  सुरु केली. विक्की मते याने घरातून लाकडी काठी आणली. अन्य आरोपींनी दिनेशला पकडून ठेवले. दिनेशला काठीने मारहाण करीत असता वडील महादेव त्याला वाचविण्यासाठी गेले. चंद्रशेखरने महादेव यांना अडविले. त्यानंतर महादेव यांच्या डोक्यावर काठीचा घाव घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महादेव यांचा मृत्यू झाला. तर, दिनेश जखमी झाला आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, कारधाचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी भेट दिली. याप्रकरणी कारधा पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे.

Share