कत्तलखोरांच्या तावडीतून सोडवलेली 3122 जनावरे गेली कुठे ?

◾️3826 जनावरांपैकी 678 जनावरे गौशाळेत, 3122 जनावरे बेपत्ता ?

प्रहार टाईम्स वृत्तसंकलन

गोंदिया 28: गोवंश हत्याबंदी व प्राणी संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी करत असतांना पोलीस विभागाकडून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनासह संबंधितांवर कारवाई केली जाते. यावेळी जनावरांची सुटका करण्यात येते आणि सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी किंवा गोशाळेत पाठविले जाते. जेणेकरून त्या जनावरांचे पालनपोषण होणार असा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत गोंदिया जिल्हात 2 वर्षात पोलीस विभागाकडून केलेल्या कारवाईत 3826 जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे. त्यापैकी फक्त 678 जनावरे गौशाळेत पाठविण्यात आले असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झालेली आहे. त्यामुळे उर्वरित 3148 जनावरे गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सविस्तर वृत्त असे गोंदिया जिल्हात गौवंश हत्याबंदी व प्राणी संरक्षण अधिनियमच्या अंमलबजावणी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कार्यकर्ता रोशन बडोले यांनी 2 वर्षात केलेले पोलीस कारवाईची जिल्हातील सर्व पोलीस स्टेशन ला माहिती मागितली होती त्यामध्ये सदर माहिती समोर आली आहे.

2 वर्षात पोलीस कारवाईत सुटका केलेली जनावरे :

देवरी उपविभाग 1698, गोंदिया उपविभाग -651, उपविभाग आमगाव 1278 ,उपविभाग तिरोडा 1137

गोंदिया उपविभागांतर्गत गोंदिया ग्रामीण पो स्टे: 19 जनावरे , पो स्टे गोंदिया : 194 जनावरे , रावणवाडी : 238 जनावरे आणि 200 शेळ्या एकूण : गोंदिया उपविभाग -651

आमगाव उपविभागांतर्गत आमगाव : 87, गोरेगाव : 287, सालेकसा : 875 व 29 शेळ्या , एकूण : उपविभाग आमगाव 1278

तिरोडा उपविभागांतर्गत तिरोडा पोलीस स्टेशन : 323 , गंगाझरी 105 व 709 शेळ्या , एकूण : उपविभाग तिरोडा 1137

देवरी उपविभागांतर्गत देवरी पोलीस स्टेशन 386, डुग्गीपार 476, चिचगड 411, नवेगाव बांध 350, अर्जुनी मोरगाव 67, केशोरी 8 एकूण : देवरी उपविभाग 1698 जनावरांचा समावेश आहे.

गोंदिया जिल्हातील 4 पोलीस उपविभागांतर्गत कारवाईत 3826 जनावरांपैकी फक्त 678 जनावरे विविध गौरक्षण संस्थेकडे पाठविण्यात आल्याची नोंद आहे. जिल्हातील 5 पोलीस स्टेशन कडे जप्त केलेली जनावरे कुठे पाठविली त्याची नोंदच नाही यामध्ये सालेकसा -875 व 25, गंगाझरी -105 व 709, केशोरी -8 जनावरे कारवाई करून जप्त करण्यात आले होते परंतु जनावरे कुठे पाठविली यांची माहिती नाही. असे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. तसेच 26 जनावरे मोर/अर्जुनी पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाने पशु पालकास परत केल्याची माहिती समोर आली आहे. उत्वरित 3122 जनावरे गेली कुठे हा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे. सदर माहिती आरटीआई कार्यकर्ता रोशन बडोले यांनी मागितलेल्या माहितीत समोर आली आहे.

गौरक्षणाचा विषय गंभीर मात्र पोलीस उदासीन: रोशन बडोले :राज्यशासनाच्या गौवंश हत्याबंदी कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे गौरक्षणचा विषय गंभीर आहे. या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असली तरी जनावरांच्या पालन पोषणाचा प्रश्न तेवढा गंभीर नाही. हे माहिती च्या अधिकारात उघड झाले आहे. पोलिसांनी 2 वर्षात कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका केली हि उल्लेखनीय कामगिरी असली तरी जनावरांच्या संरक्षणाला घेऊन पोलीस विभाग उदासीन दिसून येत आहे. यामुळे पोलीस विभागाच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे असे मत आरटीआई कार्यकर्ता रोशन बडोले यांनी व्यक्त केले.

Share