एक्ससाईजचा वाहन चालक लाच स्विकारतानां एसीबी च्या जाळ्यात

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर येथे नेमणुकीस असलेले वाहन चालक नंदकिशोर शेषराव भोयर (३६) यांनी ६ हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्याचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे येरला ता. काटोल, जि. नागपूर येथे राहत असुन खाजगी ड्रायव्हरचा व्यवसाय करतात. तक्रारदार हे मागील कोरोना काळापासून काम मिळत नसल्याने घरूनच दारू विक्रीचे काम करतात. नोव्हेंबर २०२१ मध्ये तक्रारदार यांना दारू विकतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूरचे नंदकिशोर भोयर यांनी पकडले व कारवाई केलेली होती.त्यानंतर तक्रारदार यांना दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता दरमहा ३ हजार रूपये देण्यास सांगितले. जानेवारी २०२२ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूरचे नंदकिशोर भोयर हे तक्रारदार यांच्या गावी जावून त्यांना भेटुन दारूचा धंदा चांगला करावयाचा असेल व केस करायची नसेल तर महिण्याला ६ हजार हप्ता देण्याची मागणी केली. तक्रारदार यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूरचे नंदकिशोर भोयर यांनी दर महिण्याला ६ हजार रूपये मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. नागपूर येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली. तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांनी गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूरचे नंदकिशोर भोयर यांनी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना दारूचा धंदा चांगला करावयाचा असेल व केस करायची नसेल तर महिण्याला ६ हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करुन आज ६ हजार रूपये लाच रक्कम खडगांव रोड, वाडी, नागपूर येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे. वाडी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि., नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पो. ना. सारंग बालपांडे, म. ना. पो. शि. गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, चा. पो. शि. अमोल भक्ते, सर्व ला. प्र. वि. नागपूर यांनी केलेली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share