पोलीस उपनिरीक्षक 7 लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
मुंबई – पोलीस उप निरीक्षकास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांनी रंगेहात पकडले. भरत मुंढे असे पोलीस उप निरीक्षकाचे नाव असून, ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. ७,००,०००/- रु. इतकी लाचेची रक्कम फिर्यादी यांच्याकडून स्विकारताना सदर पोलीस उप निरीक्षकास एसीबीने रंगेहात पकडले.
फिर्यादी यांच्या नातेवाईकावर ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना सह आरोपी न करण्यासाठी व बलात्काराच्या गुन्हयातील तक्रारदार हिची समजूत घालून तिने फिर्यादी विरुद्ध तक्रार करू नये यासाठी सदर पोलीस उप निरीक्षकांनी स्वतःसाठी ५ लाख रुपये वपोनिरी यांच्यासाठी २ लाख रुपये आणि बलात्काराच्या गुन्हयातील फिर्यादीसाठी ३० लाख अशी एकूण ३७ लाखाची मागणी केली असल्याबाबत फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेल्या रक्कमेपैकी ७,००,०००/- रु. इतकी लाचेची रक्कम फिर्यादींकडून स्विकारताना पोलीस उप निरीक्षक यांना एसीबीने रंगेहात पकडले. सदर प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.