महिलांनी एक तरी खेळ जोपासावा : जिल्हाधिकारी गुंडे
गोंदिया: गृहिणी व काम करणार्या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महिलांना आपल्या आरोग्यासाठी दिवसातून एक तास तरी स्वतःसाठी काढावा. त्यामध्ये त्यांनी सायकलिंग, वॉकिंग, स्विमिंग असा कोणता तरी एक खेळ जोपासावा, असे संदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिला.
सायकल संडे ग्रुपच्या वतीने ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम मागील 207 आठवड्यापासून चालवित असून या उपक्रमाअंतर्गत दर आठवड्यात रविवारच्या दिवशी शहरातील तरुण, तरुणी, वयोवृद्ध व लहान मुले देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक सायकल संडे ग्रृपच्या वतीने आज, 6 मार्च रोजी खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, गंगाझरीच्या पोलिस निरीक्षक तेजस्विनी कदम, सायकलिंग संडे ग्रृपच्या अध्यक्ष मंजू कटरे, सचिव रवी सपाटे, ज्येष्ठ सायकलपटू मुन्नालाल यादव, उत्कर्ष फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना भागवतकर, पुरुषोत्तम मोदी, पूजा तिवारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ममता येदे यांनी तर आभार प्रदर्शन त्रिवेणी डोहरे यांनी केले. दरम्यान, रॅलीमध्ये जिल्हाधिकारी गुंडे यांच्यासह सामजिक कार्यकर्त्या भावना कदम, सविता बेदरकर, डॉ. सुवर्णा हुबेकर, संगीता असाटी, माधुरी परमार, शुभा भारद्वाज, दिव्या भगत व मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवती व महिलांनी सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण संवर्धन, आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला. तसेच ज्येष्ठ धावपटू व सायकलपटू मुनालाल यादव यांचा 80 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.