वनविभाग वनसंपदेने नटलेल्या देवरी तालुक्यातील वनसंपदेचे वणव्या पासून संरक्षण करणार का ?

देवरी 7: गोंदिया जिल्हा जंगल आणि डोंगरांनी व्याप्त असून वनसंपदेने नटलेला आहे. परंतु उन्हाळ्यात हिच वनसंपदा वणवा पेटून आगीत नष्ट होत असल्याच्या घटना दरवर्षी घडतात. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे जंगल क्षेत्रात वणवा पेटण्याचा मोठा धोका वाढला आहे. परिणामी वनसंपदा सुरक्षेसाठी आता वनविभागापुढे आव्हान राहणार असून ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वनविभागाची 56 वर्तुळे असून 274 बीट आहेत. गोरेगाव, गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोर, सडक अर्जुनी, गोठणगाव, उत्तर देवरी, दक्षिण देवरी, तिरोडा, सालेकसा, नवेगावबांध व चिचगड असे 12 वनक्षेत्र आहेत. 2 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रफळ वनक्षेत्र येत असताना पैकी 1 लाख 73 हजार हेक्टर क्षेत्रफळ वनविभागाच्या अधिकारात येतो. त्याच बरोबर वन्यजीव विभागाचे नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगाव, बोंडे, डोंगरगाव, पिटेझरी, उमरझरी, कोका असे रेंज आहेत. वन विकास महामंडळाचेही जंगल क्षेत्र बर्‍याच पैकी आहे.

जिल्ह्यात उन्हाळ्यात सरासरी 40 ते 45 सेल्सिअस तापमान राहत असल्याने वनक्षेत्रात कुठे ना कुठे उन्हाळ्यात वणवाच्या घटना घडतात. त्यामुळे, वन विभागाकडून दरवर्षी जनजागृती करण्यासोबतच फायर वॉचर्सच्या मदतीने वणव्याच्या घटनांवर विशेष लक्षत असते. असे असले तरी वणव्याच्या घटना या नित्याच्याच होत आहेत. त्यामुळे वनसंपदेची देखभाल व सुरक्षा जोपासताना वनविभागाचा चांगलाच कस लागतो. हिवाळा व पावसाळ्यात जरी वनसंपदेचे सौंदर्य खुलत असले तरी उन्हाळ्यात वनसंपदेला वणव्याचा धोका राहतो. अनेक घटनांमध्ये वन्यजीव आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत असल्याचे दिसून आहे आहे. यंदा मार्चच्या सुरवातीपासून तापमान 30 अंशावर गेले असताना जिल्ह्यातील वनसंपदेला वणव्यापासून वाचविणे वनविभागापुढे आव्हान आहे.

Share