सोन्याचा दर ५४ हजार रुपयांच्या समीप, जागतिक बाजारातील मोठ्या तेजीचा परिणाम

रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानच्या युद्धाची व्याप्ती वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोन्याला जबरदस्त मागणी आली आहे. यामुळे एमसीएक्स वायदे बाजारात सोमवारी सोन्याचा प्रती 10 ग्रॅम अर्थात तोळ्याचा दर 53 हजार 797 रुपयांवर पोहोचला. गत शुक्रवारी हे दर 52 हजार 549 रुपयांवर बंद झाले होते.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली होती. त्यापाठोपाठ नवीन आठवड्याची सुरुवातही तेजाने झाली आहे. जानेवारीपासूनचा विचार केला तर सोन्याचे दर 11.70 टक्क्यांने वाढले आहेत. तिकडे जागतिक बाजारात सोन्याच्या दराने 2 हजार डॉलर्स प्रति औंसची पातळी ओलांडली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आदी कारणांमुळे सोन्याला जबरदस्त मागणी आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्याची तेजी कायम राहिली तर सोन्याचा 2075 डॉलर्स प्रति औंसचा आणि एमसीएक्स बाजारातील 56 हजार 191 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक मागे पडेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. केवळ सोने आणि चांदीच नव्हे तर विविध प्रकारच्या धातूंच्या किंमती देखील सर्वकालीन उच्चांकी स्तरावर जाण्याची शक्यता आहे.

Share