परीक्षेपूर्वी 12 वी च्या विद्यार्थिनीची आत्महत्या
साखरीटोला : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत रामपूर (पानगाव) येथील बारावीच्या विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ४ मार्च रोजी घडली. गीता गुलाब बिसेन (१८) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी ३.३०च्या दरम्यान गीताने धानावर फवारणी केले जाणारे पेन्डाल हे कीटकनाशक प्राशन केले. कीटकनाशक प्राशन केल्यानंतर तिने घरच्या लोकांना विष घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तिला तिच्या कुुटुंबियांनी त्वरित आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून तिला गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. तीन दिवस गीताने मृत्यूशी झुंज दिली. ४ मार्च रोजी दुपारी १.३०च्या दरम्यान तिचा मृत्यूझाला. दरम्यान, गोंदिया पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद घेतली.
गीता ही बोरकन्हार येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. गीताला आई-वडील व पाच बहिणी आहेत. सर्व बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. कुटुंबात तीनच व्यक्ती, गरिबीची परिस्थिती असल्याने ती स्वत: इतरांकडे शेतीचे काम करुन स्वत:च्या शिक्षणाचा खर्च करत होती. कॉलेजनंतर ती साखरीटोला येथील एका कापड दुकानात काम करत होती. मोकळ्या स्वभावाची व हसतमुख असलेल्या गीताने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे कळू शकले नाही. मात्र, ज्यादिवशी गीताने कीटकनाशक प्राशन केले, त्यादिवशी दुपारी २ वाजताच्या दरम्यान तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता, असे घरच्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरु केला आहे.
गीता ही बोरकन्हार येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती, तर बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली. परंतु, परीक्षेच्या तीन दिवसांपूर्वी गीताने कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे तिला परीक्षेचा ताण तर आला नसेल ना, यातूनच तिने आत्महत्या तर केली नसावी ना, असे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.