2000/- च्या तिकीटात गोंदिया वरून विमानसेवा , विमान प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण !

गोंदिया 5: दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश सरकारने १९४२-४३ मध्ये तालुक्यातील बिरसी येथे विमानतळाची उभारणी केली. सन २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार केले. शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत तब्बल ७९ वर्षांनंतर येत्या १३ मार्चपासून प्रवासी वाहतूक सेवेचे टेकऑफ होणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातून देश-विदेशात तांदूळ सुद्धा पाठविला जातो. या सर्व गोष्टी लक्षात घेता या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याच्या हालचाली मागील चार-पाच वर्षांपासून सुरू होत्या. आता त्याचा मुहूर्त साधला असून १३ मार्चपासून त्याला प्रारंभ होणार आहे. फ्लाय बिग कंपनीने याचे कंत्राट घेतले आहे. या कंपनीकडे चार एअरक्राफ्ट असून ७२ किंवा ८० आसन क्षमता असणारे विमान नियमित बिरसी विमानतळावरून सुटणार आहेत. येत्या काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यात बिरसी विमानतळावरून विमान सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या इंदौर-गोंदिया-हैद्राबाद विमानसेवा सुरू होणार आहे. गोंदिया ते पुणे, गोवा, रायपूर-गोंदिया-पुणे-गोवा आदी मार्गांवर देखील प्रवासी विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

या मार्गावरही सेवेचा विचार

इंदौर-गोंदिया-हैदराबादनंतर रायपूर-गोंदिया पुणे-गोवा, गोंदिया ते पुणे, गोवा, रायपूर-गोंदिया-पुणे-गोवा विमान सेवेचाही विचार बिरसी विमानतळावरून सुरू करण्याचे फ्लाग बिग कंपनीच्या विचाराधीन असल्याचे कंपनीचे अधिकारी संजय मांडविय यांनी सांगितले. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचे टेकऑफ लवकरच होण्याची शक्यता आहे.

दोन हजार रुपये असेल तिकीट

ज्या विमानतळावरून प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यात प्रवाशांना तिकीट कमी दरात (२०००-२२०० रुपये) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने उड्डाण नावाची योजना सुरू केली. त्याचा लाभदेखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया-इंदौर-हैदराबाद ते चेन्नई करिता केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share