शाळापूर्व तयारी अभियान राज्यस्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात…

◾️महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन फौंडेशन चे संयुक्त कार्यक्रम….

पुणे, (दि. 4 मार्च): राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र शासन, यांचे मार्फत जून 2022 मध्ये पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये प्रथम या स्वयंसेवी संस्थेचा सहभाग आहे. त्याच अनुषंगाने राज्यस्तरीय तज्ज्ञांचे प्रशिक्षण दि. 2 मार्च ते 05 मार्च 2022 आयोजित केले आहे. त्याची रीतसर सुरुवात दि. 2 ला जे. पी. नाईक शिक्षण व विकास केंद्र, कोथरूड, पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील बालशिक्षण व मानसशास्त्र विभागाच्या प्राचार्या डॉ. नेहा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात करण्यात आली.

प्रशिक्षणाच्या उदघाटकीय कार्यक्रम प्रसंगी प्रथम फाऊंडेशन च्या सी.ई.ओ रुक्मिणी बॅनर्जी, SCERT चे वरीष्ठ अधिव्याख्याता तथा बालशिक्षण व मानसशास्त्र विभागाचे उपविभाग प्रमुख लक्ष्मण सुपे, अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन बालशिक्षण विभागाचे कार्यक्रम निर्देशक स्मितीन ब्रीद, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राज्य प्रमुख सोमराज गिरडकर उपस्थित होते.

राज्यात या उपक्रमासाठी शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा (से.नि.), यांची प्रेरणा व राज्य प्रकल्प संचालक, राहुल द्विवेदी म.प्रा.शि. प., मुंबई, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, एस सी आर टी महाराष्ट्र, पुणे चे संचालक एम डी सिंह, सहसंचालक रमाकांत काठमोरे या सर्वांचे मार्गदर्शन लाभत आहे.

सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या ‘स्टार्स’ (STARS- Strengthening Teaching-Learning and Results for States Program’) प्रकल्पांतर्गत करण्यात येत असून यासाठी केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने जागतिक बँकेशी करार केला आहे. या प्रकल्पाची सुरुवात देशातील केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व ओडिशा या सहा राज्यात झाली आहे.

केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रणाली (NEP 2020) मध्ये या ‘स्टार्स’ प्रकल्पाला समाविष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र व राज्य शासनाने संयुक्त सहभागाने यावर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात प्रथम महाराष्ट्र राज्यातून करण्यात आली.

मागील दोन वर्षांपासून कोविड19 च्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झाले नाही त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होणेपूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हा अभियान मदत करणार आहे.

या अभियानात शाळा स्तरावर विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता बघितल्या जाणार असून ज्या क्षमतामध्ये त्यांना मदतीची गरज आहे त्या क्षमतांमध्ये पुढील दोन महिन्यांत आईद्वारे घरीच मार्गदर्शन होऊन वाढ करण्यात येणार आहे. यामध्येच पालक, आई, वडील हेच विद्यार्थ्यांचे शिक्षक होणार आहेत. तर शाळांमधील शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी, केंद्रप्रमुख, तालुका, जिल्हा पर्यवेक्षीय यंत्रणा त्या बालकांकडे वेळोवेळी भेट देणार आहे व मार्गदर्शन करणार आहेत. या पद्धतीने विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून पुढील सत्रासाठी त्याला पहिल्या वर्गात दाखल करण्यात येणार आहे. त्याचे प्रवेशोत्सव आनंदाने साजरा करण्यात येणार आहे.

करीता या शाळापूर्व तयारी अभियानात सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने SCERT चे बालशिक्षण व मानसशास्त्र विभागाच्या प्राचार्या डॉ. नेहा बेलसरे यांनी केले आहे. या उदघाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे यांनी केले तर आभार विषय सहायक शाम राऊत यांनी मानले.

Share