कोविडमुळे प्रभावित महिला व बालकांना मिळणाऱ्यायोजनांचा लाभ दयावा – जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.3 : कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या महिला व बालकांना शासन स्तरावरुन मिळणाऱ्या योजनांचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कृतीदल व मिशन वात्सल्य अंतर्गत योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे पुढे म्हणाल्या, मिशन वात्सल्य अंतर्गत तालुकास्तरवर स्थापन करण्यात आलेल्या समिती मार्फत एकल विधवा महिलांना लाभ देण्यात यावा. रस्त्यावर भटकणाऱ्या बालकांचा सर्व्हे करुन त्याचा सामाजिक तपासणी अहवाल बाल कल्याण समितीकडे सादर करण्यात यावा व त्या बालकांना शासनाच्या योजनेत समाविष्ट करण्यात यावे. तसेच बाल न्याय निधी अंतर्गत कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी, शैक्षणिक शुल्क व वस्तीगृह शुल्क देण्याकरीता जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागवून छाननी करण्यात यावी व त्यांना लाभ देण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासन स्तरावरुन विविध योजनांचा लाभ मिळण्याकरीता तसेच काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने कार्यवाही करण्याकरीता दिनांक 7 मे 2021 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता करण्यात आलेल्या कामाची माहिती जिल्हा महिला व बाल अधिकारी तुषार पौनीकर यांनी दिली.
सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर, सर्व तालुक्यातील तहसिलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, बाल कल्याण समिती सदस्य आशा ठाकूर, चाईल्ड लाईनचे समन्वयक विशाल मेश्राम तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी रविंद्र टेंभूर्णे व मुकेश पटले यांचेसह भागवत सुर्यवंशी, कपिल टेंभूरकर, धर्मेन्द्र भेलावे उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share