झाडीपट्टी नाट्य महोत्सव 2022 चे देवरी येथे थाटात उदघाटन

प्रा. डॉ. सुजित टेटे
देवरी 23:
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येथील क्रीडा संकुलात 23 ते 26 फेब्रुवारीपर्यंत झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आमदार सहषराम कोरोटे , प्रमुख अतिथी नगरपंचायत देवरी चे मुख्याधिकारी अजय पाटणकर , देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे , सांस्कृतिक कार्य संचानालय नागपूर विभागाचे संदीप शेंडे , सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे , नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे 7:30 वाजता थाटात उदघाटन पार पडले असून रसिक प्रेक्षकांसाठी नाटकाला सुरुवात झाली आहे.

झाडीपट्टी नाट्य ही विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून, जनसामान्यांमध्ये या कलेविषयी आत्मियता आहे. या कलेच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनच नव्हे, तर
प्रबोधनदेखील केले जाते. तथापि, झाडीपट्टी नाट्यकलेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
झाडीपट्टी नाटकांचे लेखक, दिग्दर्शक तथा गायक अनिरुद्ध बनकर यांचे ‘घायाळ पाखरा’ हे नाटक बुधवारी (ता. २३) सादर होणार आहे. अमरकुमार मसराम लिखित आणि सुनील अष्टेकर दिग्दर्शित ‘लोक काय म्हणतील’ हे नाटक गुरुवारी (ता. २४) होणार आहे. यश निकोडे लिखित व प्रा. शेखर डोंगरे दिग्दर्शित ‘टाकलेले पोर’ हे नाटक शुक्रवारी (ता. २५), तसेच दीपा पाटील लिखित आणि शेखर पटले दिग्दर्शित ‘लाखात एक लाडाची लेक’ ही नाटक शनिवारी (ता. २६) सादर होणार आहे. नाट्यरसिकांनी झाडीपट्टी नाट्यमहोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, नाटकांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share