जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांची निवड आज

गोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी मोर, देवरी व सडक अर्जुनी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज, 16 फेब्रुवारी निवडणूक होणार आहे. देवरी नगरपंचायत वगळता अन्य दोन्ही नगरपंचायतीमध्ये सत्तास्थापनेबाबत संभ्रमाचे वातावरण या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अर्जुनी मोर नगरपंचायतमध्ये 17 सदस्य असलेल्या या नगरपंचायतमध्ये भाजपा 7, कॉग्रेस 4, राकाँ 4, शिवसेना 1 व 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसंदर्भात संभ्रम आहे. सर्वसाधारण महिलासाठी खुला असलेल्या नगराध्यक्षपदासाठी राकाँतर्फे मंजुषा बारसागडे, कॉग्रेसतर्फे दिव्या पशिने तर भाजपतर्फे ममता भैय्या व ललिता टेंभरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

देवरी नगरपंचायतीवर 17 जागांपैकी 11 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे नगरपंचायतीवर भाजपची सत्ता जवळपास निश्चित आहे. नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत अनुसूचित जमातीच्या सर्वसामान्य प्रवर्गाला गेली. त्यामुळे भाजपचे तीन चेहरे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती. त्यामध्ये संजू उईके, कौशल्य कुंभरे व नूतन सयाम यांच्या नावाचा समावेश होता. अखेर पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी नगरपंचायतीमध्ये 17 जागासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून 7 जागा जिंकल्या. अपक्षांनी 6, काँग्रेस 2 आणि भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 1 असे पक्षीय बलाबल आहे. नगरपंचायतीवर कोणत्याही पक्षाला बहुमत नसले तरी सत्तास्थापना व त्यानंतर पद वाटपासंदर्भात अपक्ष नगरसेवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Share