सिंगणडोह येथे होणारी वृक्षतोड त्वरीत थांबवा

◾️तहसीलदार देवरी यांना निवेदन

देवरी: वनहक्क कायद्याची पायमल्ली करीत तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा सिंगणडोह परिसरात वनविकास महामंडळाने तांत्रिक बाबींची पूर्तता न करता मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वृक्षतोड तत्काल थांबविण्यात यावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी देवरीच्या उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

तहसीलदार यांच्या मार्फत उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमाप्रमाणे आदिवासींचे वनांवरील हक्क जोपासण्यासाठी व वनसंवंर्धन आणि वनोपज संकलनासाठी ग्रामसभांची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून विकास आराखडा मंजूर करून त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. असे असताना अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त अशा सिंगणडोह गावालगत महाराष्ट्र वनविकास महामंडळाने संबंधित ग्रामसभेला विश्वासात न घेता आणि वृक्षांची तांत्रिक तपासणी न करता थेट वृक्षतोडीचा निर्णय घेतला आहे. या वृक्षतोडीचा गंभीर परिणाम सर्रेगाव गटग्रामपंचायतीच्या जनतेसह पशूधनावर पडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या विषयी वनविकास महामंडळ आणि संबंधित लोकांमध्ये यापूर्वी बैठका सुद्धा घेण्यात आल्या. परंतु या बैठकांचा संबंधित विभागावर कोणताही परिणाम झाला नाही. याउलट पोलिस संरक्षणामध्ये जंगलतोड करणार, असा इशारा वनाधिकार्‍यांनी नागरिकांना दिल्याचा आरोप आहे. याविषयी योग्य तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना सर्रेगावचे सरपंच सोनू नेताम, संयुक्त ग्रामसभेचे अध्यक्ष देवविलास भोगारे, दिनबंधू ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार, आनंदराव मडावी, भगलू कोराम, उमेश बागडेहरिया, चिंधू गुरनुले, विलास सोनूले, किसन कुंभरे, अर्जुन सिंदराम आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share