गोंदिया जिल्हाच्या शिक्षण विभागाच्या साईटवर सीईओपदी अजूनही ‘डांगे’?
◾️ऑगस्ट महिन्यापासून शिक्षण विभागाच्या साइर्टवरील माहिती अद्यावत नाही
◾️शाळा Online मात्र शिक्षण विभाग अद्यावत नाही
गोंदिया 12: शासकीय कार्यालयाशी आवश्यक माहिती व योजना कार्यालयाच्या साईटवर टाकून माहिती अद्ययावत ठेवणे अपेक्षित असते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला या बाबीचा विसर पडलेला दिसत आहे. मागील सहा महिन्यांपासून शिक्षण विभागाची माहिती अद्यावत करण्यात आलेली नाही. विभागाच्या साईटवर आजही जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रदिपकुमार डांगे कार्यरत असल्याचे नमूद आहे. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांची नावे बदलले नसून जुनीचे नावे आहेत. यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कामाप्रती किती दक्ष आहेत हेच प्रतीत होते.
आजचे युग तंत्रज्ञानाचे समजले जाते. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न उराशी बाळगून सर्वत्र तांत्रिक क्रांती घडवून आणली जात आहे. शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे संगणकीकरण केले जात आहे. गोंदिया जिपचे शिक्षण विभागही संगणकीकृत झाले आहे. जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीच्या जिप, नप, अनुदानीत व खासगी अशा एकूण 1 हजार 663 शाळा आहेत. यात 2 लाख 32 हजार 623 विद्यार्थी अध्यापन करीत असून 9 हजार 646 शिक्षक कार्यरत आहेत. कोरोना काळात जिपच्या शाळांसह अनुदानीत व खासगी शाळेचे शिक्षण आभासी पद्धतीनेच सुरु होते. या काळात जिल्ह्यातील 10 हजार शिक्षक शाळेत तर 2 लाख 32 हजार विद्यार्थी घरी होते. दीड वर्षाच्या काळात शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपलब्ध साईट व तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण सुरु ठेवले. मात्र जिल्हा परिषदेच्या विभागाची विभागाची माहिती मागील सहा महिन्यांपासून अद्यावत झाली नसल्याची बाब संबंधित विभागाच्या साईटवर भेट दिली असता निदर्शनास आली.
मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून शिक्षण विभागाच्या साइर्टवरील माहिती अद्यावत करण्यात आलेली नाही. आजही शिक्षण विभागाच्या साईटवर जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रदिपकुमार डांगे यांचे नाव आहे. प्रदिपकुमार डांगे यांचे ऑगस्ट 2021 मध्ये स्थानातरण झाले होते. त्यांच्या जागी अनिल पाटील रुजू झाले आहेत. असाच प्रकार शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या नावाबद्दल झालेला दिसत आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून आजही राजकुमार हिवारे यांचे नाव असून त्यांच्या कैलास सर्याम हे रुजू झाले होते. विशेष म्हणजे, याच महिन्यातील पंधरवाड्यात प्राथमिक व माध्यमिक विभागाचे अधिकारी बदलले आहेत. असे असतानाही प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. आर. मोटघरे यांच्या ऐवजी सेवानिवृत्त झालेले कैलास सर्याम यांचे तर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रदिप समरीत यांच्याऐवजी स्थानांतरण झालेल्या संजय डोर्लीकर यांचे नाव आहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाचा युगातही गोंदिया जिपचे शिक्षण विभाग अद्यावत नसल्याची बाब मात्र सर्वसामान्यांना सलणारी आहे.