5 दिवसात कुणाकुणाचे धान खरेदी करणार ?
गोंदिया: खरीप पणन हंगामात धान खरेदीची 31 जानेवारीची मुदत संपल्यावर आता शेतकरीहित लक्षात घेत राज्य शासनाने 8 फेब्रुवारी पर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली आहे. मात्र या मुदतीत कुणाकुणाचे धान खरेदी होणार? हा प्रश्न जिल्ह्यात चर्चेत आहे. जिल्ह्यात साडेदहा हजार शेतकर्यांनी नोंदणीच केली नसल्याचे समोर आले असून अद्याप 50 हजार 866 शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत.
शेतकर्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, व्यापार्यांकडून लुबाडणूक होऊ नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन शेतकर्यांजवळील धान खरेदी केला जातो. पणन हंगाम 2021-22 अंतर्गत यंदा 1940 रुपये प्रती क्विंटल धानाला भाव दिला जात आहे. जिल्ह्यात मंजूर 107 हमीभाव धान खरेदी केंद्रापैकी सर्वच केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे. यातंर्गत आजपर्यंत 1,27, 968 नोंदणीकृत शेतकर्यांपैकी 87,454 लाभार्थी शेतकर्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या हमीभाव धान खरेदी केंद्रावर 25 लाख 66 हजार 794.08 क्विंटल धान विक्री केला आहे.
आतापर्यंत 1 लाख 64 हजार 476 नोंदणीकृत शेतकर्यांपैकी 40 हजार 275 शेतकर्यांना 31 जानेवारी रोजी धान खरेदीची मुदतीच्या आत धान विक्री करता आले नाही. विशेष म्हणजे, 10 हजार 591 शेतकर्यांनी नोंदणीच केली नसल्याचे समोर आले असून 50 हजार 866 शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. आता या शेतकर्यांना 8 फेब्रुवारी पर्यंत आपले धान विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात मागील दोन वर्षात झालेला धान खरेदी घोटाळा पाहता, कुणाकुणाचा धान खरेदी केला जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात आहे.