शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…! राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे संकेत..

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. कोरोना व ओमायक्राॅनचा वाढता धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

माध्यमांशी बोलताना मंत्री टोपे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की “राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. त्यात ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत असल्याने राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पालकांमध्येही शाळा सुरू करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत.”

15 दिवसांनंतर निर्णय
“एक वर्ग शाळा सुरू करण्यास अनुकूल असून, दुसरा वर्ग काळजीपोटी मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाही. याबाबत नुकतीच मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील 15 दिवसानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ..” असे टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, तिथे अपडेट घेऊन शाळा सुरु करण्याचा विचार सुरु आहे. काही जिल्ह्यांत अगदी नगण्य कोरोना रुग्ण आहेत. असे असताना, तेथील शाळा बंद करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचं आधीच खूप मोठे शैक्षणिक नुकसान झालं असून, आता शाळेला टाळं लावणे अयोग्य असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना शाळेत पाठवायला हवं, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा झाली असून, पुढील 15 दिवसांनंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले..

इंग्रजी शाळा आजपासून सुरु होणार
दरम्यान, इंग्रजी शाळांची संघटना असलेल्या ‘मेस्टा’ (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन) या संघटनेने मुंबई वगळता राज्यातील शाळा आजपासून (ता. 17) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मेस्टा’ संघटनेशी संलग्नित राज्यात 18 हजार इंग्लिश स्कूल आहेत. पालकांचे संमतीपत्र घेऊन या शाळा सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला असल्याची माहिती ‘मेस्टा’चे अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली.

Share