आधी खाकी वर्दी, आता पटकावला ‘मिस महाराष्ट्र’ ताज; शेतकऱ्याच्या लेकीची ‘प्रतिभा’ चमकली
◾️जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी नुकतीच मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकली आहे.
बीड : प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील आहेत. २०१० सालापासून सांगळे बीड पोलीस दलात कार्यरत असून सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मेहनतीने प्रथम खाकी वर्दी मिळवली आणि आता ‘मिस महाराष्ट्र’ हा ताज पटकवला आहे.
पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल असलेल्या प्रतिभा सांगळे कुस्तीपटू म्हणून देखील परिचित आहेत. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहत पूर्णत्वास नेले आहे.डिसेंबर २०२१ पुण्यात मिस महाराष्ट्र स्पर्धा असल्याची माहिती मिळताच त्यांनी ही स्पर्धा जिंकण्याच्या हेतून मेहनत सुरु केली. स्पर्धेत सहभागी होत त्यांनी थेट जेतेपदापर्यंत मजल मारली आहे. पोलीस दल, कुस्ती आणि आता मॉडेलिंग या क्षेत्रात सांगळे यांनी यशस्वी होत ग्रामीण भागातील तरुणींसमोर प्रेरणादायी आदर्श घालून दिलाय. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी आजोबापासून प्रेरणा घेत कुस्तीचे मैदान गाजवले. शाळेत असताना त्यांनी अनेक स्पर्धा-परीक्षांमध्ये सहभाग नोंदवला. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवला. एक कुस्तीपटू, पोलीस दलातील सेवा आणि आता मिस महाराष्ट्र असे यश मिळवताच त्यांच्यावर पोलीस दलासह संपूर्ण जिल्हातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुढील मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरु केली आहे. तसेच त्या बालविवाह विरोधात जनजागृती करणार आहेत.
मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्या शिवाय त्यांचे लग्न करू नका असे आवाहन सांगळे यांनी केले आहे. तसेच पोलीस दलामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर शाळेत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा छंद सेवेत असतानाही कसा जोपासता येतील हे पाहिले. यातूनच सौंदर्य स्पर्धेकडे वळले. कठोर मेहनत आणि समर्पणातून हे यश मिळाले, असे प्रतिभा सांगळे यांनी सांगितले.