महिला मुख्याधिकाऱ्यांची लेखपालास कार्यालयात मारहाण

मोबाईल व लॅपटॉपची केली मोडतोड – लेखपालाची पोलिसात तक्रार

बरेचदा शासकीय कार्यालयात कर्मचारी व जनता किंवा लोकप्रतिनिधी ह्यांच्यात वाद, शिवीगाळ प्रसंगी मारहाण झाल्याच्या बातम्या कानावर येत असतात मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील राज्याच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यात मात्र नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी तसेच लेखापाल ह्यांचा वाद विकोपाला गेला असुन महिला मुख्याधिकाऱ्यांनी लेखापालाच्या कक्षात जाऊन शिवीगाळ करत लेखापालाला चक्क मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे

सविस्तर वृत्त असे की जिवती नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी कविता गायकवाड ह्यांनी वेतन व भत्ते रोखल्याचा लेखापालावर आरोप करून त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली त्याचप्रमाणे लेखापालाचा खाजगी मोबाईल व लॅपटॉप फोडल्याची लेखी तक्रार लेखापाल सागर कुऱ्हाडे ह्यांनी जिवती पोलीसात केली असल्याने खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक 10 जानेवारी रोजी मुख्याधिकारी कविता गायकवाड ह्या अचानक सागर कुऱ्हाडे ह्यांच्या कक्षात गेल्या व त्यांनी तु माझा पगार कसा अडवला तुझी लायकी आहे का अशा शब्दात वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या महिला मुख्याधिकारी गायकवाड ह्यांनी कुऱ्हाडे ह्यांच्या टेबलवर ठेवलेला त्यांचा खाजगी लॅपटॉप उचलुन जोरात आदळला त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल सुद्धा फोडला. एव्हढ्यानेच समाधान न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी टेबल वर ठेवलेल्या नस्ती, पेपरवेट, कॅल्क्युलेटर इत्यादी वस्तू सुद्धा फेकुन मारल्या असा सागर कुऱ्हाडे ह्यांचा आरोप आहे.

सागर कुऱ्हाडे ह्यांच्या म्हणण्यानुसार मुख्याधिकारी गायकवाड ह्यांचे वेतन नियमितपणे दिल्या जात असून नोव्हेंबर 2021 च्या वेतनाचा चेक त्यांनी स्वतःच्याच अधिकारात रोखुन धरला असुन कुऱ्हाडे ह्यांनी जारी केलेल्या चेक चा क्रमांक व अदा केल्याची तारीख सुद्धा सांगितली आहे. त्याचप्रमणे मुख्याधिकारी नियमबाह्य पद्धतीने देयके अदा करण्यास दबाव टाकत असल्याचे त्यांचे म्हणणे असुन आपण वेळोवेळी सहकार्य करूनसुद्धा आपल्यावर महिला मुख्याधिकाऱ्यांनी शारीरिक हल्ला केला असून आपल्या खाजगी वस्तूंची नासधूस केल्यामुळे आपल्याला त्याची नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात मुख्याधिकारी गायकवाड हयांचेशी संपर्क केला असता त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ अर्धवट असुन सुरुवातीला काय घडले ह्याचा व्हिडिओ नाही असे सांगितले मात्र कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यास नियमाप्रमाणे तक्रार करून कारवाई करणे अपेक्षित असताना महिला मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करतात हे अनाकलनीय आहे.

Share