शाळा अर्ध्या उपस्थितीत सुरु ठेवण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : चित्रपटगृहांप्रमाणेच सार्वजनिक समारंभ तसेच शैक्षणिक संस्था निम्म्या उपस्थितीत सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.

चेंबर तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित प्रमुख मंत्र्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. मद्यालये सुरु पण विद्यालये बंद असे चित्र निर्माण होणे व्यवहार्य नाही. अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुरळित राहण्यासाठी तसेच भावी नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी वरील निर्णय घ्यावेत, असेही चेंबरने म्हटले आहे.

राज्य सरकारने चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आदींनी निम्म्या क्षमतेने कार्यरत राहण्याची संमती दिली आहे. पण त्याचवेळी लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, परिसंवाद आदींसाठी 50 जणांची मर्यादा निश्‍चित केली आहे. मात्र या कार्यक्रमांवर इव्हेन्ट ऑर्गनायझर्स, कॅटरर्स, टेन्ट कॉन्ट्रॅक्टर्स, डेकोरेटर्स, बँडवाले इत्यादी अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबुन आहे. 50 जणांच्या मर्यादेमुळे हे सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांची उपस्थिती किमान दोनशेपर्यंत वाढवावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

गेली दोन वर्षे शाळा-महाविद्यालये ऑनलाईन पद्धीतीने सुरु असल्याने त्याचा फार मोठा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक, मानसिक आणि वैयक्तिक प्रगतीवर झाल्याचे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिकवलेला अभ्यास विसरले असून अनेकजण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशन तसेच डोळ्यांवरील उपचारांसह अन्य वैद्यकीय उपचारांची गरज भासते आहे. शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू असून त्यांच्यात संसर्गाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियम पाळून सामाजिक कार्यक्रम व शाळा निदान अर्ध्या उपस्थितीत सुरु कराव्यात, असेही गांधी यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Share