स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा | मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन; जिल्ह्यात 25 व 26 नोव्हेंबरला विशेष मोहीम
गोंदिया, दि.24 : आपल्या गावातील स्वच्छतेच्या स्थितीबाबतची माहिती मिळविण्यासाठी शासनाने एसएसजी 2021 हा अॅप प्रसारित केला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विचारलेल्या पाच प्रश्नांचे उत्तर देवून आपणास आपले अभिप्राय यात नोंदविता येते. तेव्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावे. असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. (स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय)
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 ला सुरुवात करण्यात आलेली आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नागरिकांच्या अभिप्रायावर सर्वाधिक भर देण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात 25 आणि 26 नोव्हेंबरला विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. या अभियानात 11669 गावस्तरीय कर्मचारी, 4549 ग्रामपंचायत सदस्य आणि 16136 बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून प्रती व्यक्ती किमान 5 अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना आपला अभिप्राय नोंदविता येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्यासाठी अधिकार्यांची नेमणूक
ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, रोजगार सेवक, ग्रामपंचायत परिचर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, समुदाय संसाधन व्यक्ती, स्वच्छ भारत मिशनचे गटसंसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी, यांना यात सहभागी करण्यात आलेले आहे. प्रत्येक कर्मचार्याने किमान पाच व्यक्तीचे अभिप्राय नोंदविणे गरजेचे आहे. स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्यासाठी विभागनिहाय विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी सांख्यिकी, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
गटविकास अधिकारी यांचे उपक्रमावर नियंत्रण राहणार असून अभिप्राय नोंदविण्यासाठी त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सामाजिक माध्यमांमुळे प्रत्येक व्यक्तिमधील संवाद वृद्धींगत झाला आहे. केवळ एका क्लिकवर आपण आपले अभिप्राय, मत नोंदवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील स्वच्छता सुविधांची माहिती शासनापर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने यात भाग घ्यावा. असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले आहे.
असे अभिप्राय नोंदवा
गूगल प्ले स्टोर मधून SSG 2021 हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपले नाव, मोबाइल क्रमांक, वय व लिंग नोंदवावे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडून जिल्हा गोंदिया निवडावा. पुढे आपणास स्वच्छतेच्या बाबतीत पाच प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांचे होय/नाही असे उत्तर द्यावे. अभिप्राय नोंदविण्यासाठी केवळ दीड मिनिटांचा वेळ लागतो. यासोबतच https://ssg2021.in/citizenfeedback वेब लिंकच्या माध्यमातूनही अभिप्राय नोंदविता येणार आहे.