भंडारा : फटाके उडविण्यास व फोडण्यास मनाई आदेश

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात दिनांक 2 ते 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत दिवाळीचा सन साजरा होणार आहे. दिवाळीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर लोक मोठ्या प्रमाणात फटाके उडवितात व फोडतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जिवास धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संपूर्ण भंडारा जिल्यातील पेट्रोलपंप, गॅस सिलेंडर गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपा, फटाक्याची दुकाने, ज्वालाग्राही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो आदी ठिकाणी फटाके उडविण्यास व फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा, फटाके उडविण्याचे जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 110 ते 115 डेसिबल पेक्षा जास्त नसावी. शाळा, कॉलेज, रूग्णालय, न्यायालय ईत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोनमध्ये येतात, त्या भागात 100 मीटर परीसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. फटाक्याची लडी व असे फटाके जे मोठ्या प्रमाणात प्रदुषीत हवा, आवाज व घनकचरा तयार करतात, अशा प्रकारच्या तत्सम फटाके फोडण्यास दिनांक 2 ते 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत मनाई करण्यात आली आहे. सोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या द्यष्टीने उडणारे दिवे, कंदिल आदी उडविण्यास मनाई करण्यात येत आहे. हरीतलवाद व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रचलित आदेश व निर्देशाचे पालन करण्याविषयी आदेशाचे पालन करावे, असे अतिरीक्त जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share