देगलूर-बिलोलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोन

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा मंगळवारी निकाल जाहिर झाला. या निकालानंतर काँग्रेस नेते तथा सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना अभिनंदनाचे अनेक फोन गेले. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांचा 41,933 मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देगलूर-बिलोलीत जितेश अंतापूरकर यांच्या दणदणीत विजयानंतर अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अभिनंदनाचा कॉल आला होता.

या निकालानंतर अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी दुरध्वनीद्वारे विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारीच शुभेच्छा दिल्या होत्या, असंही अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीमध्ये ही भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षात मुख्य लढत होती. एकीकडे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे आणि दुसरीकडे रावसाहेब अंतापुरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर होते. दोनही उमेदवार तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 इतकी मते मिळाली आहेत.

Share