राज्यातील शाळा सुरु होणार ‘या’ तारखेपासून
मुंबई 24: मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळांची कुलूपे लवकरच उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना परिस्थिती पुर्वपदावर आल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर मोहर लावली आहे. तिसरी लाट येण्याआधीच तिला रोखण्यात देशाला यश मिळताना दिसत आहे. यामुळे अनेक तज्ञ लोक दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यात काही हरकत नाही, असं चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी सांगितलं होतं.
आता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होणार असल्यानं लहान मुलांसाठी लसीकरण मोहिम देखील सुरू करणं गरजेचं आहे. तर सरकार महाविद्यालयाविषयी देखील लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, “… पण पालकांची संमती आवश्यक”
सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू कराव्या अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती. शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिलं
ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार असून निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बच्चू कडूंकडूनही प्रतिक्रिया
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.