कोरोनाबळींच्या कुटुंबांना ५0 हजारांची मदत देणार
नवी दिल्ली-कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला ५0 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही रक्कम देण्यात येणार असल्याचें सरकारकडून न्यायालयाला सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सातत्याने केंद्र सरकारला विचारणा केली होती. न्यायालयाने केंद्राला फटकारले होते, अखेर आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात आतापयर्ंत जवळपास ४ कोटी लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात बर्याच याचिका दाखल झाल्या होत्या. मृतांच्या कुटुंबीयांना चार-पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र इतकी मदत देता येणार नाही, असे सरकारने न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयानं सरकारचा युक्तिवाद मान्य केला. मृतांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक रक्कम मिळायला हवी. त्यासाठी तुम्ही मार्ग काढा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या.
आपत्ती कायद्यात भूकंप, पूर यासारख्या १२ प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा समावेश होतो. या आपत्तींमध्ये कोणी जीव गमावला असल्यास त्याला राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाख रुपये दिले जातात. मात्र त्या आपत्तींपेक्षा कोरोना संकट वेगळे आहे, असे सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात म्हटले. सरकारचा दावा न्यायालयाने मान्य केला. कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना किती मदत द्यायची ते सरकारने ठरवावे. मदतीची रक्कम सन्मानजनक असावी, अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या होत्या.