नीट परीक्षेतील मोठा घोटाळा उघड : तामिळनाडू सरकारने परीक्षा रद्द करण्याचा घेतला निर्णय
मुंबई : तामिळनाडू सरकारने त्यांच्या राज्यात नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नीट परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आहे का याबाबत राज्य सरकार आढावा घेणार आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे राज्यातील नीट परीक्षेचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नीट परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्या समोर आले असून तामिळनाडूतील परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्याही केल्याची घटना घडली आहे. या परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसवून शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे सीबीआयनेही स्पष्ट के आहे. महाराष्ट्रातील आरके एज्युकेशन करिअर गाईडन्सचा संचालक परिमल कोटपल्लीवार आणि इतर काही विद्यार्थ्यांना या घोटाळ्याप्रकरणी जबाबदार धरले असून त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५० लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी डमी विद्यार्थी बसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
डमी विद्यार्थ्यांच्या मार्फत राज्यातील टॉपच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार घडत आहे. या आधीही असा प्रकार घडल्याची शक्यता असून त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.