ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला जातोय, मात्र कर नाही त्याला डर कशाला”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलेलं दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागील काही दिवसात ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अलिकडेच अनेक नेत्यांवर विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. यावरून नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरूपयोग केला जात आहे. ते सारा देश पाहत आहे. त्यामुळे कोणीतरी ओरडावं आणि आपण त्याकडे लक्ष द्यावं असं करण्याची काहीच गरज नाही, कारण कर नाही त्याला डर कशाला असं नाना पटोले म्हणाले.

किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोप करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, इत्यादी मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांनी याबाबत भाजपवर टीका केली आहे.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तो भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सोमय्या हे कोल्हापूरला जात होते तेव्हा त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत.

Share