खतांचे वाढीव भाव भोवले : जैन ट्रेडर्सवर कृषी अधिकाऱ्यांचा छापा

सालेकसा 17: युरिया खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना देत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कृषी अधिकारी व नायब तहसीलदारांनी तालुक्यातील ग्राम आमगाव खुर्द येथील सुभाष चौकातील नितीन नरेश जैन यांच्या जैन ट्रेडर्स या कृषी केंद्रावर छापा टाकला.

आमगाव खुर्द येथील शेतकरी बुधवारी (दि. १५) जैन ट्रेडर्समध्ये युरिया खरेदी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना युरिया न दिल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदार शरद कांबळे यांच्याकडे धाव घेत त्यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत त्यांनी कृषी अधिकारी सिंद्राम व नायब तहसीलदार वेधी यांना चौकशीचे आदेश दिले. यावर त्यांनी दुकानात धडक दिली असता दुकानात सायंकाळी ४-५ वाजतादरम्यान २२० बॅग साठा असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, जैन यांच्याकडे परवाना असल्यामुळे त्यांच्याकडे कीटकनाशक, खत, युरिया यांचा साठा असतो. मात्र, ते शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेऊन दिशाभूल करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. युरिया बॅगची किंमत २६६ रुपये असून, ते दुसरे औषध देऊन ५५० रुपये घेऊन लूटमार करीत असल्याचे शेतकऱ्यांचे आरोप आहेत. याशिवाय दुकानात भाव फलकावर किंमत नोंद केली जात नाही. ग्राहकांना पक्के जीएसटी बिल देत नाही. जैन ट्रेडर्स मासिक अहवाल कृषी विभागाला सादर करीत नसल्याचे चौकशी अधिकारी सिद्राम यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. जैन यांचा कृषी केंद्राचा परवाना रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी नीतेश देशमुख, देवेंद्र बहेकार, रवींद्र बहेकार, संजय हुकरे, कोमलदेव हत्तीमारे, यादव नागपुरे, लेखराम पातोडे, ताराचंद हत्तीमारे, प्रकाश वडगाये, सोना बहेकार, आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Share