PhonePe: ऑनलाईन खात्यातून उडविले ₹99.97 हजार

कॅशबॅक ऑफरपासून सावध : PhonePe कंपनीचा एजेंट सांगून फसवणूक  

गोंदिया 15 : काही लबाड व ठगबाज PhonePe यासारख्या अॅप्लिकेशन कंपनीचे एजेंट सांगतात. तसेच कॅशबॅक ऑफर स्कीम देवून ऑनलाईन पद्धतीने लोकांची लुबाडणूक करतात. हा सर्व प्रकार मोबाइल व ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शन अॅपच्या माध्यमातून घडतो. आतापर्यंत अनेकजण लोभात येवून लबाडांच्या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आणि परिश्रमातून मिळविलेली संपत्ती गमावली आहे. अशाच प्रकारच्या फसवणुकीची तक्रार एका व्यक्तीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे. त्यात ऑनलाईन त्यांच्या खात्यातून ₹99.97 हजार उडविण्यात आले. विलासकुमार राखडसिंह पवार (वय 32) रा. अदासी (तांडा) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे.

PhonePe चा अजेंट सांगून अशी केली फसवणूक

फिर्यादीला त्यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. यात आरोपी फिर्यादीला म्हणाला की, तो PhonePe कंपनीतून बोलत आहे. आरोपी पुढे म्हणाला, तुम्ही नवीन PhonePe अकाऊंट बनविले आहे. त्यासाठी कंपनीने तुम्हाला 4 हजार 999 रुपयांचे कॅशबॅक ऑफर दिले आहे. जर तुम्ही मॅसेज बघितले नसेल तर ते उघडून बघा. बघितल्यानंतर तेथे असलेल्या लिंकवर क्लिक करा व आपले यूपीआय पिन क्रमांक घालून पाच वेळा डन करा.

आरोपीचे 11 वेळा ऑनलाईन ट्रांजेक्शन

फिर्यादीला याबाबत ज्ञान नसल्यामुळे त्यांनी तेच केले जे फोनवर आरोपीने सांगितले. यात फिर्यादीला कसलेही कॅशबॅक मिळाले नाही. उलट त्यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गोंदियाच्या खात्यातून 11 वेळा ऑनलाईन ट्रांजेक्शन करून आरोपीने 99 हजार 971 रुपये उडवून फसवणूक केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 420, सहकलम 66 (ड), आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत. 

फसवणुकीसाठी कॅशबॅक (cash back) ऑफरचा लोभ 

बँकेशी संबंधित कोड नंबर, पिन नंबर व महत्वपूर्ण तथा गोपनीय माहिती कोणालाही देवू नये. याबाबत वेळोवेळी लोकांमध्ये जागृती केली जाते. त्यानंतरही लबाडांनी सांगितलेली कॅशबॅक ऑफर किंवा इतर लोभात येवून किंवा ज्ञान नसल्यामुळे ते आपली गोपनीय माहिती शेअर करतात. यातच परिश्रमातून मिळविलेली संपत्ती गमावून बसतात. फसवणूक करण्यासाठी लबाड आधीच तयार असतात.

ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शनबाबत सतर्कता 

ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शनसाठी PhonePe यासारखे अनेक अॅप उपलब्ध आहेत. मोबाइलच्या माध्यमातून या अॅपचा उपयोग करून ऑनलाईन पैशाची देवाण-घेवाण केली जाते. मात्र, हे अॅप्लिकेशन हाताळण्याचे पुरेसे ज्ञान नसेल तर लबाड लोकांकडून ऑनलाईन फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शनबाबत सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

Share