‘मास्कपासून सध्यातरी सुटका नाही, पुढील वर्षापर्यंत बंधनकारक’ : डॉ. व्ही. के. पॉल
मुंबई : देशात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. निती आयोगाने केंद्र सरकारच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे आणि मास्क घालणेही बंधनकारक आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीबरोबरच मास्कही तितकाच महत्वाचा आहे. दरम्यान, अनेक नागरिक विनामास्क रस्त्यांवरून फिरताना दिसत आहेत. दरम्यान, मास्कपासून सध्यातरी सुटका होणार नसल्याचे स्पष्टीकरण निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केले आहे. केंद्र सरकारने याबाबत निती आयोगाला प्रश्न विचारला असता, त्यांनी सध्यातरी मास्कपासून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील वर्षापर्यंत मास्क बंधनकारक असून, सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दोन लस घेतल्या असतील तरी मास्क बंधनकारक
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती. आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले होते. सध्या धोका कमी असला तरी सण, उत्सवात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. कोरोनाने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु तरी देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. अनेक नागरिक सध्या दोन लसी घेतल्यामुळे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. अनेकजण मास्कचा देखील वापर करत नसल्याचे पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर निती आयोगानेही मास्क बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही दोन डोस घेतले तरी मास्क बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले आहे. ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.
तसेच दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे हे महत्वाचे आहे.