राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आमंत्रण; 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटण्याची शक्यता
मुंबई 01: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात राज्यपाल आणि सत्ताधारी यांच्यामधील दरी वाढल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेवरील 12 नामनिर्देशित राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे नोव्हेंबर 2020 मध्ये पाठवली होती. मात्र, या 12 सदस्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यानंतर आता या 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता, मात्र राज्यपालांनी या भेटीसाठी वेळ दिला नव्हता. त्यानंतर आता राज्यपालांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी बोलवलं आहे.
मागील 26 ऑगस्टला ही भेट होणं अपेक्षित होतं. पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राज्याबाहेर दौरा असल्यानं ही भेट होऊ शकलेली नाही. मात्र, आज राज्यपालांनी भेटीसाठी वेळ दिली आहे. त्यामुळे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा मार्गावर तोडगा निघणार का? हे आज या भेटीनंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान, या 12 सदस्यांच्या नियुक्तीचा वाद मुंबई उच्च न्यायालयातही गेला होता. न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांना लवकर याविषयी तोडगा काढावा, असं सल्ला न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी आमंत्रण दिलं आहे.